सुपा येथे स्वतंत्र ग्रीनफिल्ड विमानतळ उभारण्याची मागणी खासदार नीलेश लंके यांनी नागरी उड्डयन मंत्री किंजारापू नायडू यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. सुपा विमानतळाची तात्काळ उभारणी शक्य नसल्यास शिर्डी विमानतळाचा विस्तार करून सुपा परिसराशी जोडणी करण्याचा प्रस्तावही खा. लंके यांनी ठेवला आहे.
खा. लंके यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे की, सुपा हे महाराष्ट्रातील एक महत्वाचे औद्योगिक आणि व्यापारिक केंद्र आहे. सुपा एमआयडीसीसह अहमदनगर तसेच पुणे जिल्ह्यातील कारेगांव व रांजणगांव औद्योगिक वसाहती या परिसरात आहेत. या वसाहतींमध्ये अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी मोठया प्रमाणावर गुंतवणूक केलेली आहे. मात्र विमान सेवा उपलब्ध नसल्याने उद्योगांचे दळणवळण, व्यापार, लॉजिस्टिक्स आणि वेळेचे नियोजन या सर्व गोष्टी अडचणीत येतात असे या निवेदनात नमुद करण्यात आले आहे.
विमानतळाची सुविधा निर्माण झाल्यास सुपा आणि संलग्न परिसर हा एक मोठा औद्योगिक क्लस्टर बनू शकतो. विमानसेवा उपलब्ध झाल्यास गुंतवणूकदारांचा विश्वास वाढेल आणि स्थानिक रोजगार संधीही मोठया प्रमाणावर उपलब्ध होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील उत्पादन मोठया प्रमाणावर पुणे, मुंबई आणि इतर शहरांमध्येही पाठवले जाते. विमानतळामुळे वाहतूक खर्चात घट होउन उद्योगधंद्यांना मोठा फायदा होईल. विशेषतः निर्यातक्षम वस्तूंच्या दृष्टीने ही सुविधा अत्यंत फायदेशीर ठरेल.
Post a Comment